सृष्टी युवा फौंडेशन व ग्रामस्थ वडकी पुणे तर्फे अहिल्यानगर येथे पूरग्रस्तांना मदतीचा हात; *पुढील पाच वर्षांत दहा हजार झाडे लावण्याचा संकल्प
सृष्टी युवा फौंडेशन व ग्रामस्थ वडकी पुणे तर्फे अहिल्यानगर येथे पूरग्रस्तांना मदतीचा हात; *पुढील पाच वर्षांत दहा हजार झाडे लावण्याचा संकल्प*
पुणे वैभव न्यूज नेटवर्क : पुणे
अहिल्या नगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील श्री क्षेत्र चोंडी गावात अलीकडेच आलेल्या मुसळधार पावसामुळे पूरसदृश स्थिती निर्माण झाली. अनेक कुटुंबांचे घरातील साहित्य, अन्नधान्य व कपड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अशा कठीण परिस्थितीत सृष्टी युवा फौंडेशनने सामाजिक बांधिलकी जपत पूरग्रस्तांना तातडीची मदत पुरवली.
या मदतकार्याअंतर्गत पूरग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी एक साडी, एक ब्लँकेट आणि बिस्किटांचा पुडा वाटप करण्यात आला. या उपक्रमामुळे अनेक कुटुंबांना अन्न व वस्त्र यांची तात्पुरती सोय झाली व त्यांना थोडासा दिलासा मिळाला.
कार्यक्रमास गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, चेअरमन, तसेच सृष्टी युवा फौंडेशनचे अध्यक्ष, पदाधिकारी, विश्वस्त, सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विशेष उपस्थिती लाभली.
पर्यावरण रक्षणासाठी दहा हजार झाडांचे उद्दिष्ट
कार्यक्रमाच्या निमित्ताने सृष्टी युवा फौंडेशनने पूरग्रस्त मदतीपुरतेच आपले कार्य मर्यादित न ठेवता, भविष्यात अशा आपत्ती टाळण्यासाठी पर्यावरण संवर्धन हाच एकमेव उपाय असल्याचे अधोरेखित केले.
फाउंडेशनचे अध्यक्ष यांनी यावेळी सांगितले की,
“सध्या संपूर्ण जगात व आपल्या परिसरातही पर्यावरणाचा प्रचंड ऱ्हास होत आहे. झाडांची बेसुमार कत्तल, वाढती शहरीकरण आणि प्रदूषणामुळे नैसर्गिक समतोल ढासळत चालला आहे. परिणामी दरवर्षी भयंकर पूर, अवकाळी पाऊस, दुष्काळ, वादळे अशा आपत्तींचा सामना करावा लागतो. यावर उपाय म्हणून मोठ्या प्रमाणावर झाडे लावणे ही काळाची गरज आहे.”
त्यामुळे सृष्टी युवा फौंडेशनने पुढील पाच वर्षांच्या कालावधीत एकूण १०,००० झाडे लावण्याचा संकल्प केला असून, विविध गावांमध्ये टप्प्याटप्प्याने या उपक्रमाची अंमलबजावणी होणार आहे. स्थानिक ग्रामपंचायती, शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था यांचा सहभाग घेऊन हा उपक्रम राबवला जाईल.
संस्थेचा उद्देश फक्त झाडे लावणे नसून ती जगवणे, संगोपन करणे आणि पर्यावरण जागृती करणे हा आहे. ग्रामीण भागातही हरित क्रांतीचा एक नवा अध्याय लिहिण्याचे ध्येय संस्थेने समोर ठेवले आहे.
या समाजोपयोगी उपक्रमांमुळे सृष्टी युवा फौंडेशनचे कार्य निश्चितच उल्लेखनीय असून, अशा संस्थांमुळे सामाजिक परिवर्तन शक्य होते, असे मत ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केले.


