सामाजिक

वायरमन गावात राहत नसल्याने नागरिकांची गैरसोय; वीजपुरवठा खंडित झाल्यास तासन्तास प्रतीक्षा


वायरमन गावात राहत नसल्याने नागरिकांची गैरसोय; वीजपुरवठा खंडित झाल्यास तासन्तास प्रतीक्षा
पुणे वैभव : न्यूज नेटवर्क भोर / वागजवाडी

भोर तालुक्यातील वागजवाडी व मोरवाडी ग्रामपंचायत मध्ये पाच वाड्या वस्त्यांना गेली पंधरा दिवसापासून विज पुरवठा नियमित सुरु नसल्यामुळे या दोन्ही गावातील नागरिक संतापले आहेत.
पाहिले वायरमेन अमोल पाटणे यांची बदली झाल्यामुळे नवीन वायरमेन प्रकाश चौधरी यांची नियुक्ती वागजवाडी व मोरवाडी गावांत् झाली .
पहिले वायरमेन अमोल पाटणे हे किकवीचे रहिवाशी असल्यामुळे विज पुरवठा खंडित झाल्यावर किमान अर्ध्या तासाच्या आत विज पुरवठा सुरळीत करत असत .
पण नवीन वायरमेन प्रकाश चौधरी हे 20 ते 22 किलोमीटर अंतरावर भोर शहरात वस्त्याव्यास आहेत.
वायरमन गावात राहत नसल्याने गावातील नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर दुरुस्तीसाठी संबंधित कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा करावी लागत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
गावामध्ये वीजपुरवठा खंडित झाल्यास तत्काळ दुरुस्ती होणे अपेक्षित असते. मात्र, संबंधित वायरमन गावात वास्तव्यास नसल्यामुळे वीज बिघाडाची माहिती दिल्यानंतर त्यांना बाहेरून गावात येण्यासाठी वेळ लागतो. परिणामी, नागरिकांना चार ते पाच तास अंधारात राहावे लागत असून दैनंदिन कामांवर त्याचा परिणाम होत आहे.
विशेषतः रात्रीच्या वेळी वीजपुरवठा खंडित झाल्यास महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये उकाड्यामुळे नागरिकांची अधिकच गैरसोय होते, तर विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही परिणाम होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
शेतीसाठी वीजेवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांनाही याचा फटका बसत आहे. पाणीपुरवठा योजना, मोटारपंप तसेच इतर कृषी कामे वीज नसल्यामुळे ठप्प होतात. वारंवार होणाऱ्या या समस्येमुळे ग्रामस्थांमध्ये असंतोष वाढत आहे.
गावातील नागरिकांनी संबंधित वीज वितरण विभागाकडे गावातच वायरमनची नियुक्ती करावी किंवा किमान जवळच्या परिसरात त्यांची उपलब्धता सुनिश्चित करावी, अशी मागणी केली आहे. यामुळे वीज बिघाड दुरुस्तीचे काम तातडीने होऊन नागरिकांना होणारा त्रास कमी होण्यास मदत होईल.
ग्रामस्थांनी प्रशासन आणि वीज वितरण कंपनीने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. अन्यथा मोठ्या पुणे सातारा महामार्गांवर मोठ्या प्रमाणात रस्ता रोको आंदोलन करणार असल्याची चर्चा या गावातील नागरिक करत आहेत.