शिक्षण-प्रशिक्षण

किकवीच्या विद्यालयात वारकरी दिंडी सोहळा उत्साहात


 

किकवीच्या विद्यालयात वारकरी दिंडी सोहळा उत्साहात

पुणे वैभव : भोर

विद्यार्थी वारकरी दिंडीतून संत परंपरा, व्यसनमुक्ती व पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत किकवी शिक्षण संस्था संचलित श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, किकवी (ता. भोर, जि. पुणे) येथे दिनांक 26 जुलै 2026 रोजी विद्यार्थी वारकरी दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

वारकरी दिंडीत सहभागी झालेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी पारंपरिक वारकरी वेशभूषा परिधान करून मृदुंगाच्या तालावर भजन, अभंग व गवळणी सादर करत भक्तिमय वातावरण निर्माण केले. किकवी गावातील संपूर्ण परिसर विठ्ठलनामाच्या गजराने दुमदुमून गेला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री विनोद दशरथ राऊत यांनी उपस्थित मान्यवरांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले. यावेळी विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या समृद्ध वारकरी संत परंपरेची ओळख करून देत तिचे सांस्कृतिक, सामाजिक व आध्यात्मिक महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किकवी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री दत्तात्रय भिलारे उपस्थित होते. यावेळी कार्याध्यक्ष श्री राजेंद्र निगडे, सहसचिव श्री ईश्वर भिलारे, संचालक श्री बाळासाहेब चव्हाण, संचालक श्री प्रमोद पाटणे, किकवी ग्रामपंचायतीचे सरपंच श्री नवनाथ कदम, ग्रामसेवक श्री गेजगे भाऊसाहेब, श्री अशोक राऊत, सामाजिक कार्यकर्ते श्री अजीत शेख, श्री लुकेश मोदी, श्री मंगेश काकडे, श्री तुळशीराम अहिरे, सेवानिवृत्त शिक्षक श्री विलास रनवरे, महिला भजनी मंडळाचे सदस्य, किकवी पोलिस स्टेशनचे कर्मचारी, विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याचबरोबर प्रहरी गटाच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचा संदेश देणारे फ्लेक्स प्रदर्शित करण्यात आले. अमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे दुष्परिणाम जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रभावी घोषणा देत जनजागृती केली. तसेच इको क्लबच्या माध्यमातून वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करणारे संदेश फलक सादर करण्यात आले.

भक्ती, सामाजिक जाणीव आणि पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संगम घडवून आणणारा हा विद्यार्थी वारकरी दिंडी सोहळा अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. अखेरीस विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री विनोद दशरथ राऊत यांनी उपस्थित मान्यवर, पालक, ग्रामस्थ व सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले.