भोंगवली गणातून पदमा जाधव यांना मतदारांची पहिली पसंती
भोंगवली गणातून पदमा जाधव यांना मतदारांची पहिली पसंती!
पुणे वैभव न्यूज नेटवर्क | भोर / किकवी
भोर तालुक्यातील भोंगवली गणामध्ये आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले आहे. निवडणूक आयोगाकडून आचारसंहिता लागू होण्याच्या हालचाली सुरू असतानाच, अनेक इच्छुक उमेदवारांनी मतदारसंघातील प्रत्येक वॉर्डामध्ये जनसंपर्काची चढाओढ सुरू केली आहे.
अनेक राजकीय चेहरे सध्या वाढदिवस, दशक्रिया विधी, बारसे अशा छोट्या-छोट्या कार्यक्रमांनाही उपस्थित राहून मतदारांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, या सगळ्या गदारोळात वागजवाडी गावच्या माजी सरपंच पदमा जाधव या आपल्या शांत, संयमी आणि कार्यकर्तृत्त्वशील शैलीत मतदारांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरल्या आहेत.
पदमा जाधव यांनी फक्त आपल्या गावापुरतेच मर्यादित काम न करता, भोर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेसाठी महसूल विभाग, पंचायत समिती विभाग आणि इतर शासकीय यंत्रणांमधून अनेकांना थेट अथवा अप्रत्यक्ष मदत केली आहे. कोणाचं दुःख असो वा आनंद, पदमा जाधव नेहमी हजर असतात. त्यांच्या या लोकसहभागामुळे आणि सामाजिक कार्यामुळे भोंगवली गणातील मतदारांनी त्यांना पहिली पसंती दर्शवलेली पाहायला मिळत आहे.
भोंगवली गणात सध्या पदमा जाधव यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. अनेक राजकीय पक्षांनी त्यांना आपल्या पक्षातून उमेदवारी देण्याचे आमंत्रण दिले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
पदमा जाधव या वागजवाडी ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी “घर तिथे नळ” ही योजना यशस्वीपणे राबवून गावात १०० टक्के नळपाणीपुरवठा सुनिश्चित केला. यासोबतच गावातील महिला सबलीकरणाच्या दिशेने त्यांनी उल्लेखनीय पाऊले टाकली.
गावच्या विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर महिलांचा सहभाग वाढावा, त्यांचे मत निर्णयप्रक्रियेत महत्त्वाचे ठरावे यासाठी त्यांनी नियमित महिला सभा घेतल्या आणि महिलांना ग्रामविकासाच्या मुख्य प्रवाहात आणले.
गावातील रस्ते, वीज, शिक्षण, आरोग्य आणि मंदिर दुरुस्ती यांसारख्या विषयांवरही त्यांनी ठोस कामगिरी केली. तंटामुक्त गाव करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आणि त्यांचा हा उपक्रम इतका यशस्वी ठरला की, गावाला “तंटामुक्त गाव” पुरस्कार मिळाला तसेच पाच लाख रुपयांचे बक्षीसही मिळाले.
या उल्लेखनीय कामगिरीमुळे पदमा जाधव यांना “आदर्श सरपंच पुरस्कार” उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.
गावपातळीवरील विकासकामे, महिलांच्या नेतृत्वाची जाणीव आणि लोकसंपर्क या तीन घटकांच्या आधारे पदमा जाधव यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. म्हणूनच भोंगवली गणातील मतदारांच्या मनात त्यांच्याबद्दल आदर, विश्वास आणि अपेक्षेचा सूर उमटला आहे.
आगामी निवडणुकीच्या दृष्टीने पाहता, भोंगवली गणात पदमा जाधव हे नाव आता चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. त्यांच्या कार्यकाळातील ठसा आणि जनतेशी असलेले नाते पाहता, त्या या निवडणुकीत एक बलाढ्य व प्रभावी उमेदवार म्हणून उदयास येण्याची दाट शक्यता आहे.
> “सामान्य माणसाच्या सुखदुःखात सहभागी होणं हीच खरी लोकसेवा,” असं पदमा जाधव नेहमी सांगतात — आणि त्यांच्या कामातून ते शब्द खरंही ठरवतात.


