जेजुरी पोलिसांची ‘नाकाबंदी’ यशस्वी; भरधाव XUV, उसाचे शेत आणि थरारक पाठलागानंतर युवकाची सुटका
जेजुरी पोलिसांची ‘नाकाबंदी’ यशस्वी; भरधाव XUV, उसाचे शेत आणि थरारक पाठलागानंतर युवकाची सुटका
पुणे वैभव : न्यूज नेटवर्क
भोर कापूरहोळ
(ता. भोर) येथे मंगळवारी भरदिवसा घडलेल्या अपहरणाच्या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली. एका १८ वर्षीय युवकाला काळ्या गाडीतून जबरदस्तीने पळवून नेण्यात आले. काही क्षणांत घडलेल्या या प्रकारामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
दरम्यान, जेजुरी पोलीस स्टेशन येथे वायरलेसद्वारे माहिती मिळाली की कापूरहोळ येथून एका मुलाचे अपहरण झाले असून काळ्या रंगांची XUV गाडी मांडकी मार्गे जात आहे. त्यानंतर पोलीस अधीक्षक ,पुणे व अपर पोलीस अधीक्षक, बारामती यांनी भोर विभागातील अधिकाऱ्यांचा ग्रुप कॉल घेऊन तात्काळ नाकाबंदी करण्याच्या सूचना दिल्या.
त्याअनुषंगाने पुरंदर तालुक्यातील जेजुरी पोलीस स्टेशन व नीरा चौकीच्या पोलिसांनी तात्काळ हालचाली सुरू केल्या. *जेऊर–नीरा* मार्गावर नाकाबंदी उभारण्यात आली आणि प्रत्येक वाहनाची तपासणी करत हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले.
दरम्यान, जेऊरकडून पिसुर्टीकडे जाणारी एक काळी गाडी पोलिसांच्या नजरेत आली. जेजुरी पोलीस स्टेशन अंतर्गत नीरा चौकी येथील *पोलीस उपनिरीक्षक कोकरे, पोलीस हवालदार करे व पोलीस कॉन्स्टेबल कोळेकर यांनी तत्काळ नाकाबंदी लावून गाडी दिसताच तिचा पाठलाग सुरू केला. पोलिसांनी वाहन अडवण्याचा इशारा दिल्यानंतर चालकाने गाडीचा वेग वाढवत पळण्याचा प्रयत्न केला.
पाठलाग सुरू असतानाच चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी उसाच्या दाट शेतात घुसली. त्यानंतर गाडीत असलेले काही जण वाहन सोडून उसाच्या शेतातून पळून गेले. पोलिसांनी तात्काळ गाडीपर्यंत पोहोचून तपास केला असता आत अपहरण केलेला युवक आढळून आला. पोलिसांनी त्याला सुरक्षित बाहेर काढत त्याची सुखरूप सुटका केली.
या प्रकरणात दोन जणांना ताब्यात घेण्यात आले असून आणखी काही जणांचा शोध सुरू आहे.
पळून गेलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी जेजुरी व सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांची दोन पथके परिसरात शोधमोहीम राबवत आहेत. ही संपूर्ण कारवाई जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.


