मोरवाडी पाचलिंग गावात अवैध मुरूम उत्खननामुळे निसर्गाची अपरिमित हानी; प्लॉटिंग व्यवसाय तेजीत
मोरवाडी पाचलिंग गावात अवैध मुरूम उत्खननामुळे निसर्गाची अपरिमित हानी; प्लॉटिंग व्यवसाय तेजीत
पुणे वैभव न्यूज नेटवर्क : भोर / मोरवाडी
भोर तालुक्यातील मोरवाडी पाचलिंग येथील रस्त्या लागत महसूल विभागाचा कर बुडवत हजारो ब्रास मुरूम मातीचे अवैध्य उत्खनन करून प्लॉटिंग व्यवसाय जोमात सुरु आहे.
काही महिन्यांपासून अवैध मुरूम उत्खननाचे प्रमाण लक्षणीय वाढले असून पर्यावरणाला मोठा फटका बसत आहे. डोंगरउतार, शेतजमिनी, गावालगतची मोकळी मैदाने तसेच ओढे-नाल्यांच्या काठावरून मोठ्या प्रमाणात मुरूम काढला जात असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.
विशेष म्हणजे बहुतांश उत्खनन दिवसा व रात्रीच्या वेळी जेसीबी व डंपरच्या साहाय्याने केले जात असल्याने प्रशासनाच्या नजरे समोर हा प्रकार सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
उत्खननानंतर त्या जागा समतल करून तातडीने प्लॉटिंग केली जात आहे. रस्ते काढणे, प्लॉटची मोजणी करणे आणि जाहिरातींद्वारे विक्री सुरू करणे असे प्रकार खुलेआम सुरू आहेत. अनेक ठिकाणी कोणतीही शासकीय परवानगी नसताना जमिनीचे रूपांतर करून निवासी प्लॉट तयार केले जात आहेत. परिणामी शेतीयोग्य जमीन झपाट्याने कमी होत असून भविष्यात अन्नधान्य उत्पादनावरही परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पर्यावरण तज्ज्ञांच्या मते, डोंगर सपाट केल्याने पावसाचे नैसर्गिक प्रवाह बदलतात. ओढे-नाले बुजविल्यामुळे पावसाळ्यात पाणी साचणे, पूरस्थिती निर्माण होणे आणि भूजल पातळी घटणे यांसारख्या समस्या उद्भवत आहेत. झाडांची मोठ्या प्रमाणावर तोड केल्यामुळे जैवविविधतेला धोका निर्माण झाला आहे. पक्षी व वन्यजीवांचे अधिवास नष्ट होत असून तापमानातही वाढ जाणवत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
ग्रामस्थांनी अनेक वेळा महसूल व पर्यावरण विभागाकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र, काही ठिकाणी कारवाई झाल्याचे दाखवले जात असले तरी प्रत्यक्षात उत्खनन थांबलेले नाही, अशी नाराजी व्यक्त होत आहे. काही प्रभावशाली घटकांच्या पाठबळामुळे हा व्यवसाय जोमात सुरू असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. अवैध मार्गाने कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, प्रशासनाने तातडीने संयुक्त पथक तयार करून संबंधित ठिकाणी छापेमारी करावी, उत्खननासाठी वापरली जाणारी यंत्रसामग्री जप्त करावी आणि दोषींवर कठोर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे. पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी आणि भविष्यातील संकट टाळण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
अवैध मुरूम उत्खनन व बेकायदेशीर प्लॉटिंगचा हा वाढता प्रकार वेळीच आटोक्यात न आणल्यास भविष्यात मोठ्या पर्यावरणीय व सामाजिक समस्यांना सामोरे जावे लागेल, अशी भीती जाणकार व्यक्त करत आहेत.
मोरवाडी पाचलिंग येथे अवैद्य मुरूम माती उत्खनन करून प्लॉटिंग करणाऱ्या व्यवसायिकांच्यावर दांडात्मक कर्यवाही नाही झाली तर गावातील नागरिक भोर तहसीलदार यांच्या कार्यालया समोर आंदोलन करणार असल्याचे नागरिकांनी सांगितले


