महत्त्वाचे

पुण्यातील बांधकामासाठी उत्खनन केलेला मुरूम-दगड भोर तालुक्यात भरावासाठी; वाहतुकीवर प्रश्नचिन्ह


पुण्यातील बांधकामासाठी उत्खनन केलेला मुरूम-दगड भोर तालुक्यात भरावासाठी; वाहतुकीवर प्रश्नचिन्ह

पुणे वैभव : न्यूज नेटवर्क

पुणे : पुणे सातारा महामार्गलगत असलेल्या भोर तालुक्यातील सारोळे ते शिंदेवाडी पर्यंत च्या गावा मध्ये अनेक कंपनी हॉटेल व प्लॉटिंग करणाऱ्या व्यवसायिकांनी पुणे शहर व परिसरात विविध इमारती, गृहप्रकल्प तसेच व्यावसायिक बांधकामांसाठी मोठ्या प्रमाणावर उत्खनन केले असलेल्या जागेमधून. या उत्खननातून निघणारा मुरूम, माती व दगड भोर तालुक्यातील विविध ठिकाणी भरावासाठी नेला जात असल्याचे चित्र अनेक भागांत पाहायला मिळत आहे. मात्र,
हा मुरूम-दगड कोणत्या परवानगीने काढला जात आहे, त्याची वाहतूक नियमानुसार होत आहे का आणि भरावासाठी आवश्यक परवानग्या घेतल्या आहेत का, याबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
शहरी भागात इमारतींच्या बांधकामासाठी पाया खोदताना मोठ्या प्रमाणात माती, मुरूम व दगड बाहेर काढला जातो. हा उत्खनन केलेला माल भोर तालुक्यात हॉटेल कंपनी, प्लॉट, रस्त्यालगतची जागा तसेच इतर ठिकाणी भरावासाठी नेला जात असल्याचे दिसून येते. काही ठिकाणी मोठ्या डंपरमधून दिवसरात्र वाहतूक होत असल्याने रस्त्यांवर धुळीचे साम्राज्य निर्माण होत आहे.

परवानग्यांचा मुद्दा ऐरणीवर
उत्खननातून निघालेला मुरूम-दगड वाहून नेताना संबंधित विभागाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. उत्खननाचे ठिकाण, वाहतुकीचे प्रमाण, भरावाचे ठिकाण आणि संबंधित परवानग्या यांची तपासणी होणे गरजेचे आहे. मात्र काही ठिकाणी प्रत्यक्ष परवानगीपेक्षा अधिक प्रमाणात उत्खनन अथवा वाहतूक होत आहे का, याची प्रशासनाने पाहणी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
प्रशासनाने तपासणी करण्याची मागणी
ग्रामीण भागात सुरू असलेल्या अशा भरावाच्या कामांची संबंधित महसूल, खनिकर्म तसेच स्थानिक प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करावी. उत्खनन कुठे झाले, किती प्रमाणात मुरूम-दगड काढण्यात आला, तो कुठे नेण्यात आला आणि वाहतुकीसाठी आवश्यक कागदपत्रे आहेत का, याची तपासणी करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
दरम्यान, नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात यावी, तसेच अनधिकृत उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी नियमित पथकाद्वारे तपासणी करण्यात यावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
प्रशासनाच्या तपासणीनंतरच या मुरूम-दगडाच्या उत्खनन व वाहतुकीमागील नेमकी वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे. अशी जोरदार चर्चा भोर तालुक्यातील नागरिक करत आहेत.